Friday, July 11, 2008

मालवून टाक दीप

मालवून टाक दीप चेतवून अंग-अंग !
राजसा किती दिसांत लाभला निवांत संग !

त्या तिथे फुलाफुलात,
पेंगते अजून रात;
हाय तू करू नकोस एवढ्यात स्वप्नभंग !

गारगार या हवेत,
घेउनी मला कवेत
मोकळे करून टाक एकवार अंतरंग !

दूरदूर तारकात
बैसली पहाट न्हात
सावकाश घे टिपून एक एक रूपरंग !

हे तुला कसे कळेल ?
कोण एकटे जळेल ?
सांग, का कधी खरेच एकटा जळे पतंग ?

काय हा तुझाच श्वास ?
दर्वळे इथे सुवास !
बोलरे हळू उठेल चांदण्यावरी तरंग !


गीत - सुरेश भट
संगीत - पं. हृदयनाथ मंगेशकर
स्वर - लता मंगेशकर

No comments: